वीर सावरकर चित्रपट

वीर सावरकर चित्रपट निर्मिती

१९३० च्या आसपासची घटना असेल.

सुधीर फडके नावाचा एक तरुण मुलगा त्याच्या वडिलांबरोबर थेट वीर सावरकरांच्या भेटीला गेला होता. तरुण वय. देशात सगळे भारलेले वातावरण. आणि सावरकरांच्या व्यक्तिमत्वाच्या अंगारातला चटकाही मनाला लागलेला. त्या भेटीत सुधीरने सावरकरांना काही गाणी म्हणून दाखवली. तात्याराव म्हणाले, गळा उत्तम आहे तुझा. चांगला गातोस. साधना कसोशीने कर!

भेटीने भारावून गेलेल्या त्या तरुण मुलाचा निरोप घेताना तात्यारावांनी त्याला एक भेट दिली. पुस्तक होते : ‘मला काय त्याचे, अर्थात, मोपल्याचे बंड.’ त्या पुस्तकाने बाबुजींच्या मनावर मोहिनी घातली. नंतर त्यांनी झपाटल्यासारखे सावरकरांचे सारे उपलब्ध लेखन वाचून काढले. सावरकरांच्या क्रांतीकार्याविषयीचे बाबुजींचे आकर्षण या पुस्तकांनी अधिक गहिरे केले.

पुढे स्वातंत्र्य मिळाल्याचा उत्सव देशभरात साजरा झाला, पण स्वतंत्र भारताने वीर सावरकरांची उपेक्षाच केली. त्यांच्या मृत्यूनंतरही उपेक्षेचे हे वातावरण बदलले नाही. सावरकरांचे क्रांतीकार्य आणि त्यामागची त्यांची भूमिका स्वतंत्र भारतातल्या जनतेसमोर कधी स्पष्टपणाने न आल्याचे शल्य अनेकांच्या मनात होते. अजूनही असते. बाबुजींना या उपेक्षेची चीड होती. आधुनिक भारताच्या इतिहासाला वळण देणा-या सावरकरांचे विचार, त्यांच्या थरारक जीवनातले तपशील या देशातल्या तरुण पिढीला ठाऊक असलेच पाहीजेत, अशी बाबुजींची मनस्वी इच्छा होती. राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत राष्ट्रीय व्यक्तिमत्वाच्या पायभरणीची गरज त्यांना माहीत होती. सावरकरांसारख्या क्रांतदर्शी व्यक्तींच्या विचारांमध्ये तरुण पिढीला प्रज्वलीत करणारे ओज असते, ते सातत्याने समोर लखलखत राहीले पाहीजे, असे बाबुजींना वाटत असे. त्यातूनच उत्तम चारित्र्याच्या मूल्यनिष्ठ नागरिकांची फळी उभी राहू शकेल, असा त्यांना विश्वास होता.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्राने भारलेले बाबुजींचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नसे. सावरकरांवर एक पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचे त्यांच्या मनाने घेतले. त्याविषयी ते सतत बोलत असत. जवळच्या लोकांशी समरसून चर्चा करीत, आडाखे मांडीत. खूप काळापासून त्यांच्या मनात असलेल्या या स्वप्नाला हळूहळू आकार येत गेला. चौकट ठरली. त्यात तपशील भरले जाऊ लागले. वीर सावरकरांविषयी ममत्व असलेल्या अनेक लोकांशी बाबुजी संपर्कात होतेच. त्यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा सुरू केल्या. शेवटी विचारांती निर्णय झाला. वीर सावरकरांवर पूर्ण लांबीचा चित्रपट काढण्यासाठी लोकवर्गणीतून निधी उभारावा आणि त्यासाठी स्वतंत्र न्यासाची निर्मिती करावी असे ठरले. ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ची स्थापना झाली. त्यानंतर बाबुजींनी श्वास म्हणून घेतला नाही. त्यांनी सर्व दिशांनी कामाला वेग दिला. निधी उभारणीसाठी पायाला अक्षरश: भिंगरी लावून भारतात आणि जगभरात फिरणे सुरू केले. त्यासाठी कार्यक्रमांची आखणी, आयोजने सुरू झाली. त्याचवेळी आगामी चित्रपटाची पटकथा, अभिनेते आणि इतर तंत्रज्ञांची निवड, निर्मिती व्यवस्थेचे आराखडे अशा अनेक गोष्टींची धूम उडाली.

दुदैव असे, की वीर सावरकर चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शनासाठी प्रारंभी एकत्र आलेल्या मान्यवरांशी बाबुजींचे मतभेद झाले. सावरकरांच्या विषयात या प्रत्येकाचे दृष्टीकोन वेगवेगळे होते. त्यात काहीकेल्या समान धागे सापडेनात. विचार जुळेनात. दिवसेंदिवस मतभेदाच्या भेगा वाढतच गेल्या आणि चित्रपटाचे काम रखडत गेले. शेवटी वेद राही यांनी हे शिवधनुष्य उचलले. वादविवाद आणि मतभेद असतानाही, त्यातून वाट काढून चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन अशा दोन्ही जबाबदार् या त्यांनी पार पाडल्या. रखडलेला चित्रपट अखेरीस पूर्णत्वाला गेला.

बाबुजींचे स्वप्न अखेर पूर्ण झाले होते. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘वीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शीत झाल्यावर बाबुजींनी स्वत: प्लाझा थिएटरमध्ये तो कितीवेळा आणि कुणाकुणाबरोबर पाहीला असेल, याची काही गणतीच नाही. त्यांचे मित्र,स्नेही, सहकारी अशा अनेक मान्यवरांना बाबुजी स्वत: आमंत्रण देत, त्यांच्याबरोबर स्वत:ही प्लाझाला जात आणि स्वत:च्या खिशातल्या पैशाने इतक्या सगळ्यांची तिकीटे काढायला सामान्य प्रेक्षकांबरोबर रांगेतही उभे राहात. हा चित्रपट सगळ्या भारतीय भाषांमध्ये डब करून तो भारतभरात पोचवावा, असे बाबुजींचे स्वप्न होते. त्यांना भारतातल्या सगळ्या तरुणांपर्यंत सावरकरांचे काम, त्यांचे जीवन आणि विचार पोचवण्याचा ध्यास होता.

बाबुजींच्या मृत्यूनंतर सावरकर प्रतिष्ठानने हा चित्रपट मराठी आणि गुजरातीमध्ये डब केला.

बाबुजींच्या स्वप्नाची – थोडी का असेना- पूर्तता झाली.