स्वरगंधर्वांची ओळख

मूळ नांवरामचंद्र फडके

लोकप्रिय नांवसुधीर फडके उर्फ बाबूजी

जन्मतारीख२५ जुलै १९१९

जन्मस्थानकोल्हापूर

वडिलांचं नांवविनायक फडके

आईचं नांवसरस्वतीबाई फडके

परिवार

बाबूजींनी २९ मे १९४९ रोजी त्याकाळच्या प्रसिद्ध पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी विवाह केला. त्याचे एकुलते एक चिरंजीव श्रीधर फडके स्वतःही उत्तम गायक आणि संगीतकार आहेत. श्रीधरची पत्नी चित्रा ह्या कौटुंबिक न्यायालयात वकील आहेत आणि ह्या दाम्पत्यास दोन कन्या आहेत.

शैक्षणिक पार्श्वभूमी

घरच्या खालावलेल्या परिस्तिथीमुले, खूप इच्छा असूनही, बाबूजींना हवं तसं शिक्षण घेता आलं नाही. ते जेमतेम आपलं शालेय शिक्षण पूर्ण करू शकले. प्रत्याक्षात त्यांनी मोठेपणी इंजिनियर होण्याचं स्वप्न बघितलं होतं पण परिस्थितीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. मग त्यांनी पुढे आपल्या मुलाला इंजिनियर करून आपली उच्च शिक्षणाची इच्छा अंशतः पुरी करून घेतली.

संगीतशिक्षण

बाबूजींना लहानपणापासून शास्त्रीय संगीताची आवड होती, त्यामुळे त्यांनी त्याकाळचे कोल्हापूरचे अतिशय प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक गायनाचार्य पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून काही वर्षे शास्त्रीय संगीत गायनाचं विधिवत प्रशिक्षण घेतलं. पाध्येबुवांची शिकवण्याची हातोटी इतकी विलक्षण होती की अल्पावधीतच बाबूजींनी शास्त्रीय संगीतात चांगले प्राविण्य मिळवलं. त्यांच्या संगीताचा मूळ पाया भक्कम झाला. त्यानंतर बाबूजींनी बाबुराव गोखल्यांनी सुरू केलेल्या ‘महाराष्ट्र संगीत विद्यालयात’ काही काळ शिक्षण घेतलं. पण त्याचा त्यांना तितकासा फायदा झाला नाही. मग बाबूजींनी कुणाहीकडे संगीताचं शिक्षण न घेता एकलव्यासारखं शिष्यत्व आरंभलं. स्वतःच इत्तर गायकांची गाणी ऐकून आपली गायकी फुलवत नेली. बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर आणि के. एल. सैगल त्यांचे विशेष आवडते गायक. त्यांच्या रेकॉर्डस् ऐकून त्यांनी त्यांच्या गायकीचा सखोल अभ्यास केला. त्या तिघांनाही बाबूजी गुरुस्थानी मानत.

स्वतःतील कलागुणांची पहिली जाण

गायनाचार्य पं. वामनराव पाध्ये यांचे बाबूजी लाडके विद्यार्थी होते. बाबूजींच्या संगीतक्षेत्रात होत असलेल्या प्रगतीवर ते अतिशय खुश होते. एकदा कोल्हापुरात ‘गांधर्व महाविद्यालयात’ एक आखिल भारतीय परिषद भरली होती. त्या परिषदेत हिंदुस्तानभरचे काही नामवंत गवई आले होते. त्या सर्वांच्या समोर पाध्येबुवांनी बाबूजींना उभं करून सांगितलं की, “हा माझा लहान शिष्य उत्तम नोटेशन करतो. जमलेल्या गवयांपैकी कोणीही काहीही गावं. दुसऱ्या क्षणी हा त्यांचा नोटेशन गाऊन दाखविलं.” तेथे उपस्थित असलेल्या काही नामवंत गवयांनी निरनिराळ्या रागांतील आलाप, ताना घेतल्या व बाबूजींनी तात्काळ त्याचं सहीसही नोटेशन गाऊन दाखवलं. पाध्येबुवांना वाटत असलेला बाबुजींविषयीचा सार्थ विश्वास त्यांनी सिद्ध करून दाखवला.

अशीच एक दुसरी घटना ‘महाराष्ट्र संगीत विद्यालयात’ शिकत असताना घडली. त्याकाळी कपिलेश्वरीबुवांच्या ‘सरस्वती संगीत विद्यालयात’ शास्त्रीय संगीताची स्पर्धा होत असे बाबूराव गोखल्यांनी ‘महाराष्ट्र संगीत विद्यालया’ तर्फे बाबूजींना या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पाठवलं होतं. त्या स्पर्धेसाठी परीक्षक होते प्रसिद्ध गायक अब्दुल करीम खॉंसाहेब. त्यावेळी वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी बाबूजींनी सादर केलेल्या मुलतानी रागातील एका चीजेने सभा जिंकली. बाबूजींच्या गायनशैलीने अब्दुक करीम खॉंसाहेब इतके प्रभावित झाले कि, भाग घेणाऱ्या विध्यार्थान फक्त एकच गाणं सादर करायचं हा ठरलेला नियम डावलून त्यांनी स्वतः बाबूजींना दुसरं गाणं सादर करण्याची फर्माईश केली.

या दोन घटनांनी बाबूजींचा आत्मविश्वास तर वाढलाच पण त्यांच्या जीवनाची दिशाही निश्चित झाली. नंतर गायन आणि संगीत हेच त्यांचं जीवनध्येय ठरलं.

संगीतकार म्हणून पहिली संधी

बाबूजी कोल्हापूरला असताना त्यांचे एक मित्र माधव पातकर, जे स्वतः एक चांगले गायक आणि कवी होते, भेटायला आले. त्यांनी येताना ‘दर्यावरी नाच की होडी चाले कशी भिरीभिरी’ हे ग. दि. माडगूळकरांचं गीत आणलं होतं. ते गीत पातकर स्वतः गाऊ इच्छित होते. त्यांनी त्या गीताला चाल लावून देण्याची बाबूजींना विनंती केली. बाबूजींनी लावलेली चाल सुरेख होती पण ती आपल्याला गाता येणार नाही हे पातकारांच्या लक्षात आलं. पण त्यांना ती चाल एवढी आवडली होती की त्यांनी बाबूजींना ती चाल ग. दि. माडगूळकर आणि एचएमव्ही कंपनीचे वसंत कामेरकरांना ऐकविण्याची गळ घातली. बाबूजींनी जेव्हा त्यांना ती ऐकवली तेव्हा कामेरकर अतिशय खूष झाले आणि त्यांनी ते गाणे बाबुजींनीच एचएमव्ही साठी गावं असा आग्रह धरला. अशा रितीनं बाबूजींना गायक आणि संगीतकार अशी दुहेरी संधी एकदमच चालून आली. येथूनच त्यांचा आणि ग. दि. माडगूळकरांचा एकत्रित प्रवास सुरु झाला.

चित्रपट निर्माते बाबूजी: बाबूजींनी, य. गो. जोशींच्या बरोबरीने भागीदारीत वंशाचा दिवा (१९४८) व विट्ठल रखुमाई (१९५१) या दोन मराठी आणि रत्नघर (१९५५) या एका हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी १९६१ साली त्यांनी हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटास उत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रपती “रौप्य पदक” देऊन गौरविण्यात आलं होतं. नंतर बाबूजींनी ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ ची स्थापना करून वीर सावरकर (२००२) या चिवत्रपटाची निर्मितीकेली. बाबूजींचा हा शेवटचा चित्रपटही समीक्षकांनी वाखाणला.

बाबूजींच्या व्यक्तिमत्वाचे इतर पैलू: बाबूजी प्रखर राष्ट्रभक्त आणि राष्ट्रीय सेवा संघाचे कट्टर अनुयायी होते. त्यांनी दादरा-नगर हवेली आणि सेल्वासाच्या मुक्तिसंग्रामात मोठी कामगिरी बजावली होती. त्याचप्रमाणे गोवा मुक्तिसंग्रामातही त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता. पोर्तुगीजांविरुद्ध लहान वयात लढा देऊन तुरुंगवास भोगणाऱ्या मोहन रानडे आणि तेलू मस्करेन्हास यांच्या सुटकेसाठी बाबूजींनी अथक परिश्रम केले.

बाबूजींच्या समाजकार्य: संगीतकार आणि गायक म्हणून अतिशय व्यस्त असूनही बाबूजींनी बरंच समाजकार्य केलं होतं. देशावर जेव्हा जेव्हा भूंकप, वादळं, पूर अशा नैसर्गिक आपत्ती आल्या तेव्हा तेव्हा बाबूजींनी अनेक चॅरिटी शोज करून मोठा निधी सरकारला पुनर्वसन कार्यासाठी उपलब्ध करून दिला. काही काळ ते ग्राहक चळवळीच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते.

पुरस्कार आणि मानसन्मान

बाबूजींना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार त्यांच्या जीवनकाळात मिळाले. त्यातील काही महत्त्वाच्या मानसन्मानांची व पुरस्कारांची माहित पुढीलप्रमाणे

  • १९६३ पासून दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात बाबूजींना सहा वेळा प्रपंच, संथ वाहते कृष्णामाई, आम्हीं जातो आमुच्या गावा, धाकटी बहिण, कार्तिकी आणि या सुखांनो या चित्रपटातील त्यांनी गायलेल्या गीतांसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्व् गायक म्हणून गौरविण्यात आलं.
  • १९६३ पासून दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात बाबूजींना प्रपंच आणि आम्हीं जातो अमुच्या गावा या चित्रपटाकरिता त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट संगीतासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून दोन वेळा गौरविण्यात आलं.
  • सुरसिंगार संसदतर्फे बाबूजींना त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट संगीतासाठी प्रथम १९६८ साली भाभी की चुडियाँ साठी आणि १९७० साली मुंबईचा जावई साठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराला दिल्या जाणाऱ्या स्वामी हरिदास पुरस्काराने दोन वेळा गौरविण्यात आलं.
  • १९९६ मध्ये मुंबईच्या उषःप्रभा प्रतिष्ठान तर्फे भारतीय चित्रपटासाठी दिलेल्या अनमोल योगदानाबद्दल ‘कै. व्ही. शांताराम’ यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारं पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं. त्याच वर्षी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे संगीतक्षेत्रातील कामगिरीबद्दल ‘गोदावरी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आलं.
  • चतुरंग प्रतिष्ठानतर्फे सन्मानाचा समजला जाणारा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन बाबूजींचा गौरव करण्यात आला.
  • १९९८ साली मा. दीनानाथांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमित्त प्रदीर्घ संगीत सेवेबद्दल आशा भोसले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन बाबूजींचा गौरव करण्यात आला.
  • २००१ साली बाबूजींना महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
  • बाबूजींच्या निधनानंतर २००३ साली महाराष्ट्र शासनाने बोरीवली आणि दहिसर या भागांना जोडण्याऱ्या उड्डाणपुलाचं ‘सुधीर फडके उड्डाणपुल’ असं नामकरण करून या महान संगीतकाराला मानवंदना दिली.

निधन: अल्पशा आजारानं बाबूजींचं २९ जुलै २००२ रोजी मुंबईत निधन झालं.

पोष्ट

“स्वरगंधर्व सुधीर फडके” हे पुस्तक या वेबसाइटसाठी माहितीचे प्राथमिक स्त्रोत आहे. आम्ही या पुस्तकाच्या संशोधक / संपादक आणि प्रकाशकांना मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. विश्वास नेरूरकर, श्री. विश्वनाथ चॅटर्जी आणि श्री. प्रसाद महदाकर यांनी आम्हाला “स्वरगंधर्व सुधीर फडके” चा वापर स्रोत साहित्य म्हणून करण्यास सांगितले.