गीत रामायण

“ज्योतिने तेजाची आरती” – सीताकांत लाड

ब्रिटिश आमदनी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओच्या चार वर्षांच्या कारकिर्दीनंतर स्वातंत्र्योत्तर काळात मध्यप्रदेशात होऊ घातलेल्या देशातील पहिल्या नभोवाणी केंद्रासाठी नागपूरला बदली झाल्यावर पुण्यामुंबईच्या नाट्य-संगीत-साहित्य क्षेत्रांतील नेहमीच्या सख्यासोबत्यांच्या गाठीभेटींना मुकलो होतो. कामानिमित्त उडत्या भेटी प्रसंगी होत असत, पण ते काही खरं नव्हतं. सन्निध सहवासाची मैफलीलज्जत त्यात कुठून असणार? हुरहूर लागायची, ओढ जागती व्हायची, पण तसेही सुवर्णयोग वाट पाहत असावेत.

पुणे आकाशवाणीच्या नौबती झडू लागल्या, घोषणा झाल्या. नव्या केंद्राच्या पहिल्या पलटणीत नोंदणी झालेली असल्यानं, प्रथेनुसार केंद्र सुरु व्हायच्या आधी दोन महिने, सूचना येताच पुण्यात दाखल झालो आणि मंतरलेले दिवस पुन्हा सुरु झाले. साम्राज्यशाहीपासून लोकशाहीपर्यंत येऊन ठेपलेली या माध्यमाची रेडिओ-नभोवाणी-आकाशवाणी वगैरे नामांतरं आणि धीम्या लयीत पण स्पष्ट सुरात दिसू लागलेली इतर स्थित्यंतरं, परकीय संस्कार झटकून टाकण्याचा प्रयत्न करत भारतीय संस्कृती आणि परंपरेच्या पोषणाची जाणीव जनमानसात अधिकाधिक स्थिर करू पाहत होती. ‘विद्या-उद्यम-कला-संस्कृती,! इथे न काही उणे, असे आमुचे पुणे!’ साहित्य-संगीत-नाट्य-इतिहास इत्यादी क्षेत्रातील साधनसामग्रीचं वैपुल्य, पुणे आकशवाणीला असं उपकारक आणि उत्कर्षदायक ठरणारं होतं की, तिचे सुस्वर दिमाखानं आणि समृद्धीनं पसरण्याची चिन्हं स्पष्ट होती.

कवी-कलावंत, नट-नाटककार, इतिहासकार-संशोधक-समाजनेते इत्यादींच्या बहुमोल सदिच्छा-सहकार्य यांतून कार्यसिद्धीसाठी बीजं रुजू लागली. उमेदीच्या वयातील भराऱ्या घेऊ पाहणाऱ्या उत्साहात नवनव्या कल्पना आकारू लागल्या, त्याच ध्यासानं पछाडलं. पुणे-मुंबई रस्त्यावरील वाकडेवाडीस ग. दि. तथा अण्णा माडगूळकरांच्या बंगल्यात पु. भा. भावे, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, ग. रा. कामत अशा मंडळींचे मित्रमेळावे भरू लागले. बोलपटांच्या संगीतयोजनांसाठी साप्ताहिक भेटी देणारे बाबूजी प्रगटले की, अण्णांच्या काव्याची शब्दरूपी चित्रं भावमाधुर्यात गाऊ लागायची. काही गुणगुणत फाटकातून आत शिरतानाची बाबूजींची वैशिष्ट्यपूर्ण ‘चाल’ त्यांचा मूड सांगून जायची. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर नेमणूक झाल्यावर माडगूळकरांचं नातं तिथं जमवून घेतलं होतं, कार्यातही गुंतवलं होतं. ते मर्ढेकरांच्याबरोबर काव्यानंदात रमले. सहसा न रंगणारी त्यांची तबियत प्रसन्न झाली. काव्याबरोबर कथा- नाटिका-संगीतिकालेखनात माडगूळकर रमत. या पार्श्वभूमीचा लाभ पुढील कार्यासाठी मोलाचा होता. दादरला एका लहानशा खोलीत आम्ही एकत्र राहत असताना रेडिओशी जमलेलं कवीचं हे नातं, आमच्या नागपूरच्या बदलीमुळे आळसावत गेलं, दूरदूरच राहिलं. अनेकविध व्यापतापांमुळे या माध्यमात बाबूजी विशेषत्वाने लक्ष घालू शकले नाहीत, तरी व्यावसायिक ध्वनिमुद्रिकांसाठी,भावगीत हा गानप्रकार लोकप्रियता जिंकीत असताना, गदिमा-बाबूजींचा सहयोग महत्वाचा ठरत होता. अण्णांचं रेडिओबरोबरचं नातं पुनश्च जुळवून, अशा सहयोगात ते काव्यसंगीतधन पसापसा भरून रसिक महाराष्ट्राला वाटण्याचे सुवर्णयोग पुण्यात यावेत अशी आकांक्षा बाळगून होतो. त्याचा पाया रचला जात असावा.

बाबूजींच्या प्रफुल्ल संगीतानं नटलेले गदिमांच्या पटकथेचे, राजा परांजप्यांच्या दिग्दर्शनाखाली बोलपट तेजीत चालले होते. या त्रिकुटानं त्या सृष्टितील जमाना पालटला होता! मन्वंतराची नांदी गायली होती, लोकांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या रसाळ स्वरातील प्रासादिक गीतं घराघरांत नांदत होती. मावळतीकडे कललेली ती दुनिया मराठी चित्रपटसृष्टीतील नवयुगाची ग्वाही देत होती. अण्णा-बाबूजींच्या जोडीचा बोलबाला वाढत होता. या आणि इतर सांस्कृतिक चळवळींचं पुण्यातील हर्षोल्हासी वातावरण काही आकर्षक योजनांसाठी आकाशवाणीला उपकारक होईलसं वाटणं स्वाभाविकच होतं. अपेक्षा उंचावत होत्या.

१९५३ च्या २ ऑक्टोबरला गांधीजयंतीच्या सुमुहूर्ती पुणे आकाशवाणीचा आरंभ गदिमा गीतानंच झाला – ‘नादकमल फुलले, स्वरगंधाने कैक योजने वारे दरवळले’ अनुकूल साधनसंपत्तीच्या पार्श्वभूमीवर डौलात आणि प्रौढीत आकाशवाणी कैक योजनं मिरवू लागली, गजबजू लागली. दिवस भराभर कसे जात होते कळेना. मेळावे रोजचे. अण्णा-बाबूजींच्या स्वतंत्र कार्यक्रमांत खंड नव्हता. १९५५ च्या आरंभीच्या योजना निश्चित करताना रामनवमीसाठी कीर्तन-भजन-पुराण, एखादी सांगीतिका वगैरेंच्या पार पलीकडे जाणारे काही वेगळं अभिनव सुचावंसं वाटत होतं. चित्रसृष्टीत आज इथे तर उद्या तिथे धावपळ करणाऱ्या सुधीरबाबूंना इच्छित कार्यासाठी पकडणं महामुश्किल. वेळात वेळ काढून त्यांनी दिग्दर्शित केलेल्या गदिमांच्या संगीतिकांचा प्रभाव विरला नव्हता, पण अभिरुचीहीन गाण्यांची चलतीही पुरती मंदावत नव्हती. समाजाच्या सांस्कृतिक भूमिकेच्या पोषणासाठी सुयोग्य असं सदभिरुचीसंपन्न, दर्जेदार सुगमसंगीतकार्य जोवर निर्मिलं जात नाही तोवर मुळात सत्प्रवृत्त असलेल्या रसिक वृत्तीत बदल होणं नाही, मनोरंजनाच्या सवंग आवडीनिवडीचा श्रोत्यांच्या मनावरील पगडा पुसट होत जाणंही कठीण, या विचारांबरोबर ते मंतरलेले दिवस तशा काही ताकदीची वाट पाहत होते आणि ती ताकद अवतीभवतीच खेळत होती.

रामनवमीचं स्मरण झाल्या दिवसापासून मानसिकता राममय झाली असली पाहिजे. बंगल्याच्या आवारातील वटवृक्षाच्या छायेखाली पहुडलो असता तासभराच्या ऑपेराची कल्पना सुचवत जातो, तोवर अण्णांची रसवंती पुराणिकाच्या सात्विक भूमिकेत चमकू लागली. तो प्रकृतिधर्मच महाभारत-रामायणादि पुराणकथा आणि रसात्मक धार्मिक साहित्य संस्कारानी घडवलेला, पूर्वप्रेमाने पोसलेला तसाच भारतीय संस्कृतीतील चिरंतन श्रद्धा आणि मूल्यांविषयीच्या भक्तीनं जोपासलेला. पिंड मुळात कथेकरी-हरदासाचा. वडिलांकडून हे धन खूप घेतलेलं. मोरोपंत-वामनपंडितांचा अभ्यास, वाल्मिकी रामायणाची गोडी. सीतारामायण-काशीरामायण-गंगारामायण-लघुरामायण अशा कित्येक रामायणांचा रसपूर्ण उल्लेख त्या ओजस्वी वाणीच्या प्रसन्न प्रवाहात होत गेला – “वनवासातून परतल्यावर सीता आपल्या सखीला रामायण सांगते. त्या सीतारामायणाची भाषा पाहता, सबंध रामायण मोरोपंतांनी लिहिले नसून एखाद्या प्रतिभाशाली पतिव्रतेनंच लिहिल्याचा भास होतो!” हे तर सामान्य माणसाच्या काळजाला हात घालणारं, संसारातील सुखदुःखांचा पुनःप्रत्यय देणारं, शेकडो नाट्यपूर्ण प्रसंगांना संपन्न करू शकणारं प्रचंड भांडवल आपल्या सांस्कृतिक जीवनातील विसाव्याचं स्थान. या कहाणीला आपल्या प्रतिभेची लेणी चढवून रामजन्मापासून कवीनं ती गीतबद्ध केली आणि बाबूजींनी अभिजात संगीतचातुर्याची आणि कंठमाधुर्याची जोड देऊन सजवली, तर वर्षभरात ती रसिकांची मने भरभरून तृप्त करील असा माझा अंदाज. आणि तीनचार प्रसंगांच्या ऑपेराची कल्पना विरघळून गेली. तिच्या क्रमशः दीर्घकालीन प्रसारणाची नवयोजना कवीपुढे मांडली, राममयतेतच त्यानं ती तात्काळ उचलून धरली आणि मनात या वेळेपावेतो घोळत राहिलेले काव्यचरण पूर्वस्मृतींसह अचानक, उत्स्फूर्तपणे प्रगटले, “जुन्या आस्तिक्याच्या कौटुंबिक वातावरणात वाढलेल्या मनात, श्रीरामाची व्यक्तिरेखा लहानपणापासून घर करून. बालपणात रामायण आवडलं ते अद्भुताच्या गोडीनं. ओव्या लिहाव्याश्या वाटल्या, त्या बालसुलभ अनुकरण-प्रियेतेनं. श्रवण, वाचनाचे संस्कार झाले. रामचरितातील माणसांची सुखदुःखं तर स्वतःच्याच अनुभूतीशी येऊन भिडली. त्या अनुभूतीच आता प्रगटीकरणासाठी धडपडू लागताहेत. ऐक, अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगुटी, बिजधर्माच्या द्रुमाचे कणकण गेले पोटी; छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची धुंडिली, कोण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली; देववाणीतले ओज शीतल ते माझ्या ओठी, वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी; झंकारती कंठविणा येति चांदण्याला सूर, भावमाधुर्याला येई महाराष्ट्री महापूर -” आणि सर्वस्पर्शी प्रतिभेचा शब्दप्रभू जन्मभराच्या संस्कारांनाच शब्दरूप देण्यासाठी सज्ज झाला!

महन्मंगल कार्याची सिद्धता कशी सुरळीतपणे पार पडली! खळबळ उडवायला महिनाभर आधीपासूनच्या आगाऊ घोषणा पुरेशा होत्या – “विशेष सूचना. कवी ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या गीतरामायण या कार्यक्रमाची सुरुवात येत्या रामजन्मदिनी शुक्रवार ता. १ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी होत असून, १९५६ मधील रामनवमीपर्यंत ते चालू राहील. कार्यक्रमातील प्रत्येक गीत, दर शुक्रवारी-शनिवारी-रविवारी सकाळी पावणेनऊ ते नऊच्या दरम्यान सादर करण्यात येईल. गीतरामायणाचे संगीत दिग्दर्शक आणि प्रमुख गायक आहेत सुधीर फडके.”

३१ मार्च १९५५. मुंबईहून सकाळच्या गाडीनं बाबूजी, ललिताबाई, त्यांच्या मातोश्री आणि साडेचार वर्षांचा श्रीधर असे चौघं पुण्याला माणिक वर्मांच्या घरी आले. सायंकाळी पाचच्या सुमारास माडगूळकर हजर होताच गप्पांनंतर अण्णांनी गीतरामायणातलं पहिलं गीत प्रसंगासह वाचून दाखवलं, थोडा सुसंवाद झाल्यावर रात्रौ अकरा वाजता आकाशवाणीवर भेटायचं ठरवून आम्ही परंतु लागतो तोच खाली खेळत असलेला श्रीधर वर आला आणि आपली मान दुखत असल्याचं रडक्या आवाजात सांगू लागला. त्याचं अंगही तापलेलं होतं. बाबूजींच्या सूचनेप्रमाणे त्यांचे अत्यंत निकटचे मित्र डॉ. शि. न. साठ्ये यांच्या दवाखान्याकडे श्रीधरसह सर्व मंडळी निघाली आणि रात्रौ साडेनऊ वाजता ध्वनिक्षेपित होणारी बाबूजींच्याच संगीत दिग्दर्शनातील गदिमारचित पारिजातक ही संगीतिका ऐकण्यासाठी ते घरी राहिले. रात्रौ ८ वाजता माणिकबाई परतल्या म्हणाल्या, “दवाखान्यात खूप गर्दी आहे, इतरांना यायला वेळ होईल, म्हणून मी एकटीच परत आले.” नऊ वाजून गेले तरी ललिताबाई, श्रीधर आले नाहीत. अस्वस्थ मनःस्थितीत सभोवार पाहत राहिलेल्या बाबूजींना माणिकबाईंनी दिलासा दिला, “काळजी करू नका, डॉक्टर त्या सर्वांना घेऊन त्यांच्या घरी गेले असतील. आकाशवाणीवर पोहोचवतील.”

आणि पारिजातक संगीतिकेचं प्रसारण संपताच बाबूजी व माणिकबाई आकाशवाणीकडे निघाले. कविवर्य, बाबूजींचे सहाय्यक प्रभाकर जोग, इतर साथीदार, आमचे अधिकारी-तंत्रज्ञ-कर्मचारी-कार्यकर्ते यांचा, एखाद्या मंगल कार्यस्थळी दिसावा तसा वावर स्टुडिओच्या आतबाहेर सतत चालू होता. के.डी. दीक्षित, भास्करराव भोसले, भगवान पंडित, नेमिनाथ उपाध्ये, कृष्णराव सपाटे इत्यादींचा सहभाग मोलाचा. कार्याचा प्रभावच असा की, सहकाऱ्यांनी त्याच्या निर्मितीत स्वयंस्फूर्तीनं आणि भक्तिभावनेनं स्वतःला गुंतवून घेतलेलं, साक्षात बालगंधर्वांची खास उपस्थिती. बाबूजींनी त्यांचे शुभाशीर्वाद घेतले, आणि संध्याकाळी ऐकवलेलं गीत माडगूळकरांकडे चाल लावण्यासाठी मागितलं. गीत आपल्याकडे नसून संध्याकाळच्या बैठकीत ते त्यांच्याकडेच दिलं असल्याचं सांगताच बाबूजी ठामपणे उत्तरले, “माझ्याकडे तुम्ही गीत दिलेलं नाही. आणखी कुणाकडे दिलं असल्यास चौकशी करा.” माडगूळकर, “मी स्वतः गीत तुमच्या हातात दिलेलं होतं.” बाबूजी, “अनेक मंडळी जमलेली होती, चुकून तुम्ही कुणाच्यातरी हातात मला देण्यासाठी दिलंही असेल.” माडगूळकर (बाहेर निघण्याच्या पवित्र्यात) “मी घरी चाललो, पुन्हा गीत लिहिणार नाही!!”

मध्यरात्र उलटून गेलेली. शाब्दिक चकमक अप्रिय वळण घेऊ पाहत असल्याचा संभव अंदाजून मी म्हणालो, “अण्णा, वेळ दडवण्यात अर्थ नाही, सकाळी पावणेनऊ वाजता, हजारो नव्हे, लाखो कान, रेडिओकडे लागून राहिलेले असतील. हा साऱ्यांच्याच प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. उत्तर तुझ्याच हातात आहे. ऑफिस उघडून घेतो, सर्व व्यवस्था करतो. तिथे स्वतंत्र खोलीत बसायचं. बाहेरून दाराला कडी लावीन. नवीन गीत लिहून होताच दार वाजवायचं.” माडगूळकर खोलीत स्थानापन्न, आम्ही बाहेर उभे. रुद्रावतार बराच शमलेला दिसत होता. वातावरण सुन्न, बाबूजी शांत, अंतर्मनातील द्वंद्वाच्या वादळातही खंबीर. त्यांच्याही आयुष्यात श्रद्धांना महत्वाचे स्थान होते. अंगीकृत कार्याची सुरवात अविचल निष्ठेनं केल्यावर वाटचालीतील अडथळ्यांना न डगमगता धैर्याने सामोरे गेल्याची उदाहरणं बाबूजींच्या आयुष्यात घडली होती, घडत होती. त्या व्यक्तिमत्वाचं हे एक अविभाज्य अंग. अल्पावधीतील आमची बातचीत संपते न संपते तोच, अहो आश्चर्यम! पलीकडल्या खोलीचं दार आतून वाजलं आणि हातात कागद घेऊन समोर कवी, “रचना किंचित बदलली गेली असावी. ‘पुत्र सांगती चरित पित्याचे’, यापुढील कल्पना नवी – ‘ज्योतीने तेजाची आरती!’ पुन्हा हरवू नका.”

बाबूजी काही बोलणार तोच त्यांना स्टुडिओत घेऊन गेलो, वादकांसमवेत ते चाल लावण्यात व्यग्र होऊ लागले. पहाटे दोनचा सुमार होता. अर्ध्या गीताला चाल लावून झाली आणि बहुधा, श्रीधरची आठवण बेचैन करू लागल्यामुळे असावे, बाबूजी एकदम थांबले. माणिकबाईंना विचारल्यावर त्या म्हणाल्या, “श्रीधरला घटसर्प झालाय!, रेल्वे स्टेशनच्या मागील नायडू हॉस्पिटलमध्ये ठेवलंय!” आम्ही अवाक झालो. बाबूजी इस्पितळात पोहचताच मेट्रन पुढे येत म्हणाली, “तुम्ही भाग्यवान आहात. योग्य वेळी तुमच्या डॉक्टरांनी मुलाला इथं पाठवलं, आणखी अर्धा तास गेला असता तर मुलगा तुमच्या हाती लागला नसता!”

इतकं ऐकल्याबरोबर कशा विमनस्कतेत बाबूजी परत फिरले असतील श्रीरामच जाणे! स्टुडिओत येताच त्यांनी पेटी पुढे ओढली उरलेल्या अर्ध्या गीताला चाल लावली. गीत त्यांनाच गायचं होते, वादकांसह दोनदा ते गीत मायक्रोफोनसमोर गायले, तंत्रज्ञानसह सारे मुद्रणासाठी सज्ज झाले आणि रेकॉर्डिंग सुरु होणार तोच माडगूळकर म्हणाले, “थांबा बाबूजी एक छान कल्पना सुचलीय. निवेदिकाच्या गीतापूर्वी कुश-लव ‘श्रीराम, श्रीराम, श्रीराम’ असं तीन वेळा गातील आणि नंतर निवेदक गायला सुरुवात करील” बाबूजी विचारात पडले, पहाटे चार वाजता कुश-लव आणायचे कुठून? पण त्यांच्याजवळही अर्थात कल्पना होत्याच. माणिकबाई तिथं होत्या, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गाडी पाठवून ललिताबाईंना बोलावून घेण्यात आलं. त्या कुश-लवांनी बाबूजींच्या दिग्दर्शनाप्रमाणं तीन वेळा ‘श्रीराम, श्रीराम, श्रीराम’ असं म्हटलं, त्याला जोडून पुढचं सर्व गीत बाबूजी गायले आणि अनेकविध तऱ्हांच्या दिव्यांत अखेर सकाळी पाच वाजता हे ध्वनिमुद्रण पार पडलं. अभिजात सुरांच्या वर्षावात भिजवणारा श्रवणमहोत्सव ठरल्याप्रमाणे ठीक पावणेनऊ वाजता सुरु झाला. ‘सुगंधसे स्वर भुवनी झुलले’ आणि ‘सात स्वरांच्या स्वर्गामधूनी, नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी’ आकाशवाणीवर बाबूजींच्या गळ्यातून उतरू लागताच ‘संगमी श्रोतेजन’ न्हाऊ लागले.

पुढील काही गीतं ऐकल्यावर बालगंधर्व म्हणाले, “अशाच चाली मिळत गेल्या तर आमच्या स्वयंवर नाटकासारख्या त्या घरोघरी खेळू लागतील देवा!” आणि तस्संच झालं! लोकाग्रहास्तव प्रमुख दैनिक वृत्तपत्रांतून दर शुक्रवारी सकाळी फुलांच्या चौकटीत गीत प्रसिद्ध होऊ लागलं, गल्लो गल्लीतील रेडिओसेटला गंधाक्षता, फुलं अर्पण करून उदाच्या सुगंधात भाविकजन गीतरामायणाचं सामूहिक श्रवण करू लागले.

संकल्पाच्या उदघाटनाचे पहिले वहिले प्रवेश इष्टापत्तीत पार पडले होते. सिद्धीसाठी वर्षभराच्या या कामगिरीतील वाटचालीत, इतर कामं सांभाळून काही पवित्रे ठरवणं अण्णा-बाबूजींना प्राप्त होतं. त्यांनी ते योजलं, कार्याला व्रत मानून त्यांचं पालन ते करू लागले. मुळात गदिमा कोपिष्ट. प्रन्नतेत ओघवणाऱ्या लेखणीला व्यत्यय खपत नसत, ते स्वभावात नाही. गीतरामायणाचा वर्षभराचा कार्यकाळ त्यांची कसोटी पाहणारा. अशा काही मौलिक लिखाणात अडथळे आणले गेले तर कागद किती दिवस बाजूला पडतील आणि आळस जागा होऊन किती वेळ खाईल याचा नेम नाही. हा धोका पत्करावा लागू नये यासाठी मिळतं जुळतं घेत तडजोडी करत राहणारी शांतचित्त भूमिका. येणाऱ्या जाणाऱ्यांची सतत वर्दळ. रामजन्माचं गीत जवळ आलेलं! सकाळी गावाकडल्या माणसांनी घर फुललेलं, लेखन बहरलेलं. विद्यावहिनी दोनदा चौकशीचा प्रयत्न करून गेल्या. अयोध्येच्या प्रासादातील सुखाला सीमा राहिल्या नव्हत्या, नगरजनांचा आनंद तर नुसता भरून ओसंडत होता, अयोध्यावासी स्त्रिया आनंदगीत गात होत्या, पुनःपुन्हा गात होत्या… ‘चैत्रमास त्यात शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला?…’ पायऱ्यांवरून पुन्हा वहिनी, “का हो प्रसूती झाली नाही वाटतं अजून? मंडळी थांबली आहेत.” त्यावर कवी, “नाही, अजून नाही. अगं इथं रामाचा जन्म व्हायचा आहे, कुणा माडगूळकरांचा नव्हे! थांबा म्हणावं आणखी थोडे! जेवूनच जा.”

बाबूजींचं जिणं अधिक दगदगीचं. स्वतःच्या अनुभूतींशी येऊन भिडणाऱ्या अनेक प्रसंगांना त्यांना गातं करायचं होतं. आपल्या चळवळी सांभाळीत ते पार पाडणं हेही एक दिव्यच! पण अशा काही दिव्यत्वाचा ध्यास हे तर त्यांचं जीवितकार्य. रचना आणि गायन या दोन्ही दृष्टींनी सर्वोत्तम ठरलेल्या गीतातील बाबूजींना भावलेलं ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा’ हे एक गीत. या गीतानंही त्यांना भेडसावू पाहणारे प्रश्न सभोवार निर्माण करून ठेवावेत याला काय म्हणावं? चाल लावण्यासाठी बाबूजी आदल्या दिवशी रात्री मुंबईहून पुण्यास पोहचले. त्यांनाच ते गायचं होतं. ठरल्याप्रमाणे गीत वेळेवर मिळालं असतं तर रात्री चाल लावून झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं प्रसारण ठरल्याप्रमाणे सुरळीत पार पडलं असतं. त्यासाठी प्रभाकर जोगांना त्यांनी वादकांसह सकाळी साडेसहा वाजता पुण्यातील आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी हजर होण्यास सांगितलं होते. पण प्रसारित होणारं गीतच सकाळी साडेसातनंतर त्यांच्या हाती पडलं! दहा कडव्यांच्या गीताला चाल लावून, ती वादकांकरवी बसवून घेऊन वेळीच आकाशवाणीवर पोहोचणं आणि ती गाणं वगैरे गोष्टी केवळ अशक्य कोटीतील होत्या. पहिल्या दोन ओळींना सुचेल ती चाल लावून बाबूजींनी वादकांना स्वरलेखनासह आकाशवाणीवर पुढे पाठवून दिलं. दरम्यानच्या वेळात तशा घाईतही त्यांनी चारपाच वेळा गीत वाचून काढलं. लावलेली चाल, गीताचा प्रसंग आणि काव्य, याच्याशी विसंगत असल्याची जाणीव झाल्यामुळे रिक्षात बसताना ते असमाधानीच होते. वाहन अर्ध्या वाटेवर आले आणि बाबूजींना अकस्मात गीताच्या आरंभासाठी अत्यंत अनुकूल स्वर सुचले. त्यांनी रिक्षा थांबवून त्याचं स्वरलेखन करून घेतलं, आकाशवाणीवर पोहचताच वादकांना आधी दिलेलं रद्द करून नवीन स्वरलेखन घेण्यास सांगितलं. हे सर्व हां-हां म्हणता पार पडलं, प्रत्यक्ष प्रसारणास काही मिनिटांचा अवधी उरलेला असतानाही गीतार्थ जाणून घेण्यासाठी बाबूजींची दृष्टी, त्या कागदांवर सारखी फिरतच होती. तोच स्टुडिओच्या दरवाजावरील लाल दिवा लागला, गीताचं प्रास्ताविक झालं, बाबूजी गाऊ लागले आणि प्रत्येक कडव्याला अर्थवाही अशी अचूक स्वरमाधुरी त्यांच्या गळ्यातून स्त्रवू लागली – ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा!’ थेट प्रसारण झालेलं हे गीत रिवाजाप्रमाणे तंत्रज्ञांनी तबकडीवर ध्वनिमुद्रित करून घेतलं. व्यवहारातील नित्याच्या सुखदुःखसंवादात या काव्यमौक्तिकातील त्रिकालाबाधित वचनांचा वापर सर्वत्र सर्रास होऊ लागला. ‘वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा, मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’!

बाबूजींच्या अशा चालींची गंगोत्री बालगंधर्वांच्या गायकीत असावी. गीतरामायणाला सुरांचा साज चढवताना एकही चाल अभिजात वाटचालीपासून ढळलेली नाही, देवांचीच गायकी ती! म्हणूनच ते गाणं मराठी घराघरातील माजघरापर्यंत जाऊन पोहोचलं आणि मनात कधी रुजलं, ते बुजुर्गांनाही नाही कळलं. बालगंधर्व आणि बाबूजी-दोघांच्याही गायनात जाणकारांबरोबर अजाणकारांचीही जवळीक साधण्याचं, त्यांना भावण्याचं असाधारण सामर्थ्य आहे. त्यांच्याआधी कुणीही गायलं नाही असं हे गाणं, गदिमांनी रचलेलं बाबुजींनीच गावं अशा जमान्यातच गीतरामायणाची निर्मिती सुरु झाली, मराठी भाषेतील शब्दसुरांचा हा योगही पुढे अभूतपूर्व ठरला!

भावगीत गायनाचा प्रसार झपाट्यानं होत असतानाच्या नवयुगात गंधर्वगायकीचे भूषणालंकार शास्त्रीय थाटात गीतांवर चढवत आणि आपल्या स्वंतत्र बुद्धीची भर त्यात घालीत बाबूजींनी सुगम संगीत क्षेत्रात क्रांतिकार्य केलं. त्या गायकीच्या अंगोपांगांच्या सुक्ष्माभ्यासी तपस्येचं हे फलित. प्रसंगानुकूल आणि रसानुकूल अशा विविध रागांच्या छटा त्यांनी बुद्धिकल्पकतेनं गीतात खेळवलेल्या आहेत. भावगीतागायनचा महाराष्ट्रातील प्रवास सर्वप्रथम असा रंगतदार करण्याचं श्रेय सर्वस्वी बाबूजींचंच! चालींची तालीम देताना शब्दोच्चार सुस्पष्ट आणि गीतार्थाची हानी करणारे नसावेत यावर त्यांचा इतका तीव्र कटाक्ष की, शब्दच नव्हे, अक्षरावरील स्वराघात आपलं पूर्ण समाधान होईपर्यंत ते घोटून घेत. बालगंधर्व गीतरामायण ऐकत होते, बाबूजींच्या कर्तृत्वाची त्यांना जाण होती. गायनाचार्य भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव, बाई सुंद्राबाई यांसारख्या मातब्बर संगीतकारांच्या दिग्दर्शनात ज्यांचं गाणं आयुष्यभर बहरत राहिलं त्या बालगंधर्वानी बाबूजींच्या संगीत योजनेस तात्काळ मान्यता देऊन, त्यांनी निर्मिलेल्या विठ्ठल रखुमाई बोलपटात संत तुकारामांची भूमिका स्वीकारावी आणि जाहीर भजनात त्यातील अभंग गावेत, यापरता बाबूजींच्या सांगीतिक बुद्धिमत्तेचा गौरव कोणता?

गीतरामायण हा एकाच कविनं वर्षभर रचलेला आणि एकाच संगीतकारनं वर्षभर संगीतबद्ध केलेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव चमत्कार! काव्य आणि संगीत प्रतिभाचं अतिरम्य, उत्तुंग कैलासलेणं! कविनं त्याचं शिल्प योजलं, संगीतकारनं वाजतगाजत त्याची उभारणी केली.

पुणे आकाशवाणीच्या माथ्यावर चढलेला तिच्या कर्तबगारीचा हा दिमाखदार शिरपेच चाळीस वर्ष तळपत राहिलेला आहे. अनंतकाळ तो असाच राहो आणि या दोन महान प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वांची आठवण चिरकाल दरवळत ठेवो.

‘गीतरामायणा’ चं रामायण – गजानन दिगंबर माडगूळकर

गीतारामायणाचं गीत-संगीत ऐकल्यानंतर बऱ्याच रसिकांना प्रश्न पडतो कि हे घडलं कसं? हा प्रश्न मीदेखील जेव्हा स्वतःला विचारतो तेव्हा मला जाणवतं की हे जाणूनबुजून ‘केलेलं’ नाही तर आपोआप ‘झालेलं’ आहे. सीताकांत लाड नावाचे एक अतिशय कल्पक अधिकारी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर कार्यरत होते. आकाशवाणीची लोकप्रियता वाढवण्यासाठी अनेक उत्तमोत्तम कल्पना वापरून ते कार्यक्रम तयार करत असत. केवळ नोकरी म्हणून नोकरी करणं असा त्यांचा सरकारी खाक्या नव्हता. ते आणि माडगूळकर अगदी घनिष्ट मित्र होते. बऱ्याचवेळा ते एकत्र फिरायला जात असत. त्या भटकंतीत अनेक गोष्टींवर चर्चा होई. नवीन पिढीवर काहीतरी चांगले संस्कार होतील. तिच्यापुढे चांगल्या परंपरा उभ्या राहतील अश्या तऱ्हेनं काव्य आणि संगीत यांचं सुरेख मिश्रण असलेला एखादा दीर्घकाळ चालणारा कार्यक्रम माडगूळकरांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी लिहावा अशी लाडांची एक कल्पना होती. माडगूळकरांनाही ती आवडली. त्यांनी सलग कथासूत्र असलेल्या रामाची कथा गीतरूपानं सलग वर्षभर चालवण्याची कल्पना मांडली. या गप्पा चालल्या असतांना रामनवमी जवळ येऊन ठेपली होती. लगेच ठरलं, रामनवमी ते रामनवमी वर्षभर कार्यक्रम करायचा. माडगूळकरांनी लिहायचं ठरवलं. अर्थातच, संगीत मीच द्यायचं हेही अपरिहार्यपणेच आलं.

‘आकाशवाणी’ त्यावेळी मला नि माडगूळकरांना घरच्यासारखीच होती. ऐका व्याध सांगती कथा आणि पारिजातक या माडगूळकरांनी लिहिलेल्या संगीतिका मी रेडिओसाठी केलेल्याच होत्या. त्यामुळे माडगूळकरांच्या जोडीनं माझं नाव नक्की होणं रास्तच होत. मी मुंबईला राहत असे पण माझं यशवंत चित्र हे वितरणाचं ऑफिस पुण्याला होत. त्यामुळे मी वरचेवर पुण्याला येत असे आणि टिळक रोडवरील ठोकळांच्या ‘कोंदण’ बंगल्यात राहत असे. एकदा ‘कोंदण’ वर लाड आले. म्हणाले, “बाबूजी, असं गीतरामायण करायचं.” मी म्हटलं, “करूया.”

लाडांशी बोलणं झाल्यानंतर मला गीतरामायणातील वेगवेगळ्या भूमिकासांठी योग्य गायक कलावंत निवडण्यापासून सर्व कामाची जबाबदारी घ्यावी लागली. माडगूळकर लिहून मोकळे होत, पुढे व्याप खूप असे. प्रत्येक भूमिकेसाठी वेगळा कलावंत घ्यायचा असं मी ठरवल्यानं मी योग्य गायकांचा शोध घेऊ लागलो. गीतरामायण हा जरी सुगम संगीताचा प्रकार असला तरी मी त्याच्या चाली शास्त्रीय संगीतावर बेतायच्या ठरवलेलं असल्यानं मला तशाप्रकारे गाणं म्हणू शकणारे गायक हवे होते. या व्यतिरिक्त आकाशवाणी हे फक्त श्राव्य माध्यम असल्यानं गाण्यातून संपूर्ण घटनेचं चित्र उभं करू शकणारे गायक मला हवे होते. मी पहिल्यापासूनच चित्रपटाचं काम करत असल्यानं माझा तशाप्रकारचे गायन करू शकणाऱ्या प्रतिभावान गायकांशी संबंध आला होता.

माडगूळकर प्रत्यक्षात कोणत्या प्रसंगाचं, कोणाच्या तोंडचं गीत सादर करणार हे त्यांना आणि मला दोघांनीही ऐनवेळेपर्यंत माहित नसायचं. त्यामुळे जसजसे प्रसंग माडगूळकर लिहीत गेले, तसतसे कलाकार रेडिओला सुचवणं हे माझं एक काम झालं. त्यात आणखी गाणी वेळेत न मिळण्याचा प्रश्न होताच. मी गाणार असलेली गाणी सोडून बाकीच्यांची गाणी माडगूळकर किमान १-२ दिवस आधी देत. मला चाल लावून, दुसऱ्याकडून गाऊन घ्यायची आहेत याचं अवधान माडगूळकर बाळगित, मात्र मी म्हणणार असलेली गाणी चुकूनही आधी देत नसत. क्वचित एखादंच गाणं वेळेत देत. अर्थात त्यांना लिहायला वेळच मिळत नव्हता, एवढं चित्रपटाचं काम त्यांना होतं. असं असलं तरी माडगूळकरांनी रचलेल्या काव्याचं असं वैशिष्ट्य होतं की गीत समोर आलं, वाचलं की पटकन त्याला अनुकूल राग, अनुकूल स्वर लगेच सुचत. माझं कौशल्य फक्त गाणी आठ-आठ अंतऱ्याची असल्यानं एकसुरी वाटू नयेत म्हणून प्रयत्न करण्यात असे. मग मी प्रत्येक अंतऱ्याला त्याच रागाच्या बंधनात वेगवेगळी आकर्षक पण अर्थानुरूप स्वररचना करण्याचा प्रयत्न करी. मनात आंतरिक तळमळ असे की हे काम माझ्या हातून चांगलं व्हावं.

माडगूळकरांच्या काव्याचा महिमा म्हणा किंवा माझं उत्तम करण्याचे प्रयत्न म्हणा – कारणं काहीही असोत, पण गीतरामायणाचं संगीत आपोआप तयार होतं गेलं. कुणीतरी ते काम आमच्याकडून करवून घेतलं. आता पुन्हा असं गीत-संगीत होणार नाही.

गीतरामायणानं माडगूळकरांना कवी म्हणून सर्वोच कीर्ती मिळवून दिली. या महाकाव्यानं ते अमर झाले. आज एकटाकी योजनाबद्ध लिहिल्यासारखं वाटणार गीतरामायण एका वेळेला न लिहिता प्रत्येक आठवड्यास एक याप्रमाणे ५६ आठवडे त्यांनी लिहिलं. तरी त्याचा धागा कुठं सुटला नाही. त्यातील पाहिलं गीत ज्या श्रेष्ठ दर्जाचं आहे त्याच दर्जाची बाकीची सर्व गीतं झाली. असा दर्जा आणि सातत्य राखणं हे फार कठीण काम आहे. सतत तेरा महिने सर्वांना बांधून ठेवेल असं काव्य रचत राहणं हे त्यांच्या असामान्य प्रतिभेचं द्योतक आहे. इतर सर्व काम आणि प्रापंचिक नि व्यवसायिक व्याप सांभाळून हे काम सातत्यानं आणि गोडवा, रसनिष्पती नि काव्यगुण जराही ढळू न देता पूर्ण करणं हे फक्त माडगूळकरच करू जाणोत. इतर अनेक चित्रपटांचं कथालेखन, काव्यनिर्मिती , लेख हे सर्व करत असताना वेळात वेळ काढून न चुकता प्रत्येक आठवड्यास एक गीतं याप्रमाणं हे गीतरामायण त्यांनी लिहिलं ही गोष्ट लक्षात घेतल्यावर त्याची सलगता कुठे तुटली असती तरी ती क्षम्य ठरली असती. पण असं कधी आणि कुठंच घडलं नाही.

गीतरामायणाचं पाहिलं गीतं आकाशवाणीवरून प्रसारित झाल्या झाल्या लोकांच्या प्रतिसादाची कल्पना आली. रेडिओच्या इतिहासात न भूतो न भविष्यति, असा पत्रांचा पाऊस पडला. काही पत्रं अशी होती की, “आम्ही सकाळी रामायणाच्या वेळी रेडिओपुढे उदबत्ती लावतो आणि समूहानं भक्तिभावानं रामायणाचं श्रवण करतो.” ते वाचून मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. खुद्द माडगूळकरांना एक क्षण असं वाटलं की आता आयुष्य संपलं तरी हरकत नाही.

त्याकाळी आजच्यासारख्या रेकॉर्डिंगच्या सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. आकाशवाणीवर रेकॉर्डिंग करताना फारच अडचणी येत. एकतर आकाशवाणीचा रेकॉर्डिंग स्टुडिओ फारच लहान होता. त्यामुळं एखाद्या गाण्यात जास्त वादकांची आवशक्यता असल्यास अडचणीची परिस्थिती येई. ‘सेतू बांधारे सागरी’ या गाण्याच्यावेळी तसं घडलं होतं. वादकांना तेवढ्या लहान स्टुडिओत एकत्र बसवणं शक्य नव्हतं. मग स्टुडिओचं दार उघडं ठेऊन बाहेरच्या पॅसेजमध्ये वादकांना बसवण्यात आलं. तालवाद्यांत मला ढील वगैरे सारखी काही परंपरागत वाद्य हवी होती. पण ती उपलब्ध झाली नाहीत. मग साईड ड्रम, बेस ड्रम अश्या पाश्चिमात्य वाद्यांचा असा वापर केला की परिणाम भारतीय वाटावा. रेकॉर्डिंगसाठी एकच मायक्रोफोन होता. एवढ्या अडचणी असूनही म्युझिकचं उत्तम बॅलन्सिंग साधलं गेलं. आता हे तंत्र खूप सुधारलंय. पण त्या प्राथमिक अवस्थेतही उत्तम दर्जा राखला गेला. त्यावेळी एक तामिळ इंजिनिअर होते, ते तर मला म्हणाले की, “आमच्या कर्मचाऱ्यांना बॅलन्सिंग कसं करतात हे सांगण्यासाठी तुम्ही लेक्चर्स घ्यायला या.” अर्थात ते मला शक्य नव्हतं.

तांत्रिक अडचणींबरोबर परिस्थितीजन्य अडचणींनाही तोंड द्यावं लागे. एकदा रेकॉर्डिंग करण्यासाठी मुंबईहून निघालो. गाडी कल्याण स्टेशनवर येऊन काहीतरी अडचणीमुळे थांबली ती तब्बल दहा तास. त्यामुळं रात्री पुण्याला पोचण्याऐवजी सकाळी कसाबसा पोचलो आणि रेकॉर्डिंग पार पाडलं. अशी धावपळ नेहमीचीच होती. गीतरामायणातील सर्वात गाजलेल्या ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या गीताचं प्रसारणही अशाच परिसथितीला तोंड देऊन झालं. ज्या दिवशी ते होणार होतं त्या दिवशी सकाळी साडेसात वाजता ते गीत माझ्या हाती आलं आणि त्याच प्रसारण होणार होतं पावणेनऊला. कितीही घाईत चाल बसवायची ठरवलं तरी एक तास जाणार होता. तरी बरं की आकाशवाणीनं इतर कार्यक्रमांशी संबंध नसलेले १० वादक केवळ गीतारमायणासाठी राखीव ठेवलेले होते. पण वेळ फारच कमी होता. आधी फक्त मुखडा बसवलेला होता. मी व माझे सहाय्यक प्रभाकर जोग यांना सांगून वादकांकडून बसवून घेण्यासाठी आकाशवाणीवर पाठवला. त्यावेळी खटकत होतं की काही खरं नाही. पण पर्यायच नव्हता.

नंतर एस. पी, कॉलेजजवळील विश्वास कुंटे यांच्या घरून बिल्डिंगकडे जाणाऱ्या वाटेवर, रास्तेवाड्यापाशी अचानक ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ चे सूर सुचले. रिक्षा तिथंच थांबवली. नोटेशन केलं. पुन्हा रिक्षा पुढे निघाली आणि कसाबसा आठ वाजून पस्तीस मिनिटांनी आकाशवाणी केंद्रावर पोचलो.

दारात रेडिओचे अधिकारी माझी वाट पाहत थांबले होते. प्रसारणासाठी अवघी ५-६ मिनिटं शिल्लक होती. मी धावत स्टुडिओत गेलो. दरम्यान मी आधी पाठवलेल्या मुखड्याच्या चालीप्रमाणे वादक रिहर्सल करत होते. मी त्यांना म्हटलं, “थांबा! हे सूर बदला. मी सांगतो ते नवीन सूर पटकन वाजवा,” असं सांगून मी रिक्षात सुचलेले सूर त्यांना सांगितले. माझ्या संगीत परीक्षेचीच ती वेळ होती.

अनाउन्सर ज्या खोलीत बसतो, त्या खोलीतून स्टुडिओत अनाउन्समेंट ऐकू येत नाही. माझ्याकडे तर फक्त गीत आलेलं! आधीच्या प्रस्तावनेची कॉपी हातात नव्हती. त्यामुळे अनाऊन्सरला किती वेळ लागतोय, हे माहित नव्हतं. फक्त प्रसंग काय तो समजून घेतला. भरत रामाला भेटायला आलाय आणि राम भरताची समजूत घालतोय एवढंच कळलं. आता काही क्षणच बाकी होते. ८.४५ ला लाल दिवा लागेपर्यंतच्या सेकंदासेकंदाला अस्वस्थता वाढत होती. त्यामुळे धड ओळी गुणगुणता येईनात. मी फक्त एकच करत होतो. जितक्या वेळा वाचता येईल, तितक्या वेळा ओळी वाचत होतो. अक्षरावरती दृष्टी ठरत होती हे नशीब. वादकांना सूचना दिली फार जोरात वाजवू नका. फक्त फॉलो करा. लिहून दिलेली ओळ, कडवं संपलं की रिपीट करा. यातनं जे सूर निर्माण झाले ते आपणा सर्वांस माहितच आहेत. बहुतेकांच्या पसंतीला हेच गाणं उतरलं.

गीतरामायणाच्या प्रत्येक गाण्याला अनुकूल असेच गायक निवडले होते, पण तरीही अत्यंत समर्पक निवड ठरली ती योगिनी जोगळेकरांची त्या शूर्पणखेचं ‘सूड घे लंकापती त्याचा’ हे गाणं म्हणत. यातला क्रोध, यातलं नाट्य, यातला उपहास त्यांनी उत्तम व्यक्त केला. त्वेषानं वेड लागल्यासारखं हसणं, चिडून हुंदके देणं, असहाय्यता या सर्वांचं मिश्रण स्वरांत यावं असं मी त्यांना सांगितले होतं आणि त्यांनी जे सादर केलं त्याला तोड नाही. स्वरांतून, शब्दांतून, नाट्यप्रकटीकरणाचा उत्तम नमुना म्हणजे योगिनी जोगळेकरांचं गाणं. सेंटीमेंटल गाणी गाणं सोपं, पण संमिश्र भावना व्यक्त करणारं हे गाणं म्हणणं अवघड होतं. पण या गाण्याच्या रेकॉडरिंगनंतर माडगूळकरांनी, “पोरीनं माझ्या गाण्याचं सोनं केलं” असे उदगार काढले. माझ्या जाहीर कार्यक्रमांत सुरुवातीला मी हे गाणं म्हणत नसे आणि जाहीरपणे सांगत असे की, जोगळेकरांइतके मला हे गाणं गायला जमणार नाही, म्हणूनच हे गाणं वगळतोय. आपणच बसवलेलं, आपल्याला गायला जमणार नाही, हा अनुभव आजवर एकदाच आला तो या गाण्याला.

गीतरामायण हे आकाशवाणीसारख्या सरकारी माध्यमातून सादर झालं असलं तरी तिथे लाल फितीचा कसलाही त्रास आम्हाला झाला नाही. उलट आकाशवाणीमध्ये गीतरामायण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग हा उत्सवच होता. बहुतेक गाणी रात्री साडेदहानंतर पहाटेपर्यंत रेकॉर्ड झालेली आहेत, कारण आकाशवाणीचे इतर कार्यक्रम रात्री साडेदहाला बंद होत. आकाशवाणीच्या सर्व तंत्रज्ञानीही मेहनतीत कसूर केली नाही. सर्व तांत्रिक अडचणींना तोंड देत उत्तम रेकॉर्डिंग करून दाखवलं. दिवसभर ड्युटी करून आकाशवाणीचे सारे अधिकारी रात्री पुन्हा येत, इंजिनिअर्स तर गीतरामायणासाठी रात्रीची ड्युटी मागून घेत.

गीतरामायणाची सांगता झाल्यावर फारच अस्वस्थता आली. पुढे २-३ वर्षापर्यंत कुठल्याही चित्रपटाचं संगीत करताना रामायणाचे स्वर सुचायचे. डोक्यात तेच यायचं. फार त्रास व्हायचा. नवं काही सुचायचं नाही. गीतरामायणाचं वर्ष संपल्यावर जाणवलं की खूप ताणातून आपण मुक्त झालोय गीतरामायण वर्षभर सहज घडत होत. त्यावेळी काही वाटलं नाही. पण त्या काळात किती मानसिक ताण पडत होता, ते नंतर जाणवलं.

आकाशवाणीवरील गीतरामायणाचा कार्यक्रम संपल्यानंतर जवळजवळ अडीच वर्षांनी त्याचा जाहीर कार्यक्रम करण्याचा योग आला. पुण्यातील एका हॉलमध्ये माडगूळकरांचा सत्कार होणार होता. प्रा. ना. सी. फडके त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्या कार्यक्रमांत गीतरामायणातील काही गाणी मी सादर करावी अशी कल्पना पुढे आली. मी होकार दिला आणि तो कार्यक्रम झाला. बहुतेक ५८ साल होतं. आठ आणे तिकीट सत्कार समारंभाला होत. असं असूनही गीतरामायणाच्या प्रेमामुळे हॉल तुडुंब भरला. ते पाहून मला गीतरामायणाचे जाहीर कार्यक्रम करण्याची कल्पना सुचली. मग पहिला कार्यक्रम नूतन मराठी विद्यालयात ठेवला. १२ आणे तिकिट ठेवलं. अफाट प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नियमितपणे कार्यक्रम सुरु केले. जवळजवळ १५०० कार्यक्रम केले. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक झाले पण त्याव्यतिरिक्त बिहार, ओरिसा, आसाम आणि राजस्थान ही चार राज्यं सोडून संपूर्ण भारतात झाले. परदेशांत लंडन, मँचेस्टर, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, शिकागो, टोरंटो व मॉरिशसलाही अनेक कार्यक्रम झाले.

गीतरामायणाची कीर्ती ऐकून विविध थरांतील अनेक मान्यवरांनी ते ऐकण्याची इच्छा व्यक्त केली आणि ऐकलं. त्यातील काही संस्मरणीय आठवणी माझ्या मनावर कोरलेल्या आहेत. पंढरपूरला सर्वोदय संमेलन भरलं होत तेव्हा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आले होते. तिथे गीतरामायणाचा कार्यक्रम ठरला होता. माडगूळकरांनी राजेंद्र प्रसादांना गीतांचा अर्थ हिंदीत समजावून सांगितला. नंतर राजेंद्र प्रसादजींनी तो कार्यक्रम पूर्णपणे तल्लीन होऊन पहाटे साडेतीनपर्यंत ऐकला. त्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी विनोबाजी भावेंनी पहाटे पाच वाजता गीतरामायणातील गीत ऐकण्यासाठी फक्त वीस मिनिटं दिली होती. प्रथम ठरलेल्या वीस मिनिटांऐवजी विनोबांनी प्रत्यक्षात तो कार्यक्रम दीड तास ऐकाला. ‘रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण’ हे गीत ऐकताना त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहून लागलं.

नागपूरच्या एका जाहीर कार्यक्रमात गोळवकरगुरुजींनी गीतरामायण ऐकलं. कार्यक्रम तीन दिवसांचा होता. फक्त शेवटच्या दिवशी गुरुजी आले होते. कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर येऊन गुरुजींनी मला मारलेली मिठी मी कधीच विसरू शकणार नाही. तेव्हा ते मला म्हणाले, “मी किती अभागी, तू इतके दिवस गीतरामायण गातोस पण मला मात्र फक्त आजच ऐकयाला मिळालं.” त्याच कार्यक्रमाला सुप्रसिद्ध क्रांतिकारक डॉ. खानखोजेही उपस्थित होते. त्यांनी तर कार्यक्रम संपल्यावर येऊन नमस्कार केला आणि म्हणाले, “गीत ऐकतांना मला तुमच्यात श्रीरामचंद्रांचं दर्शन झालं.” स्वातंत्र्यवीर सावकारांच्या समोर जेव्हा ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे गीत सादर केलं तेव्हा त्यांच्याही डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले, तो माझ्या जीवनातील कृतार्थतेचा क्षण होता. गीतरामायण गायनातील सामर्थ्य मला त्या दिवशी प्रकर्षानं जाणवलं.

गीतारामायणाचं आजवर अनेक भाषांत रूपांतर झालं. हिंदीत अनेकांनी भाषांतर केलं पण त्यांपैकी दोघांनी केलेलं भाषांतर गायलं जात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरच्या पं. हरी व्यासांनी केलेलं भाषांतर इंदोरचे बाळ गोखले गातात आणि पं. रुद्रदत्त मिश्र यांचं वसंत आजगांवकर गातात. गुजराथीत हंसराज ठाकूरांनी भाषांतर केलं. ते कुमुद भागवत गातात. कानडीत हुबळीच्या प्रा. बी. एच. तोफखाने यांनी केलं आणि ते अनेक कानडी गायक गातात. त्यांपैकी श्री. आर. एन. जोशी पाच्छापूरकर, त्यांचे शिष्य कामत, मिरजकर, प्रा. सौ. माला दीक्षित आणि मंगळूरचे तरुण गायक उपेन्द्र भट हे मुख्यतः कानडी रामायणाचे कार्यक्रम गाजवतात. बंगालीत सौ. कमला भागवत यांनीच भाषांतर केलं, त्याच ते गातात. तेलगू भाषेत केलेला अनुवाद धोंडू शास्त्री गातात. असे अनेक भाषांत गीतरामायणाचे अनुवाद झाले. ते सर्व गीतरामायणाच्या मूळ चालीवरच गायले गेले.

गीतरामायणाच्या जाहीर कार्यक्रमाची सुरुवात होऊन २५ वर्ष पूर्ण झाली तेव्हा पुण्यात खास अयोध्यानगरी उभारून दहा दिवसांचा मोठा सोहाळा पार पाडला गेला. पण गीतरामायणाचं ते यश बघायला माडगूळकर राहिले नाहीत. माडगूळकरांना आपण याचि देही याचि डोळा पाहिलं असल्यानं आपल्याला त्यांचं काही विशेष महत्त्व कदाचित वाटल नसेल. पण आणखीन शंभर वर्षांनी त्यांची गणना संतांमध्ये केली जाईल इतकं उत्कृष्ट दर्जाच्या काव्यरचना त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. गीतरामायणाच्या यशात जेव्हढा वाटा माझ्या संगीताचा आहे तेवढाच तो माडगूळकरांचा प्रासादिक काव्यरचनेचा आहे यात तिळमात्र शंका नाही. मागे वळून बघताना माला पुनःपुन्हा हे जाणवतं की गीतरामायण हे ‘केलेलं’ नाही तर आपोआप ‘झालेलं’ आहे.